Showing posts with label Polya/Dose/parathe. Show all posts
Showing posts with label Polya/Dose/parathe. Show all posts

Thursday, July 28, 2011

दुधी भोपळ्याचे थालीपीठ - Dudhi Thalipeeth

Lauki Thalipeeth in English

वेळ: ३० मिनिटे
वाढणी: ३ ते ४ मध्यम थालीपीठे

bottle gourd recipe, lauki pancakes, fasting recipes, fast recipes, vrat ka khana, dudhi bhoplyache thalipith, thalipeeth recipeसाहित्य:
१ कप सोलून किसलेला दुधी भोपळा
दीड ते दोन कप उपवासाची भाजणी किंवा गरजेनुसार
३ हिरव्या मिरच्या, ठेचून
१/४ चूप बारीक चिरलेली कोथिंबीर
१/४ कप भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट
चवीनुसार मीठ
तूप किंवा शेंगदाण्याचे तेल थालीपीठ भाजताना

कृती:
१) किसलेल्या दुधीमध्ये हिरवी मिरची, मीठ, शेंगदाण्याचा कूट, आणि कोथिंबीर घालून मिक्स करावे. गरजेनुसार भाजणी घालून कणकेला भिजवतो तेवढे घट्ट भिजवून घ्यावे. भिजवलेल्या पिठाचे टेनिसच्या बॉलएवढे गोळे करून घ्यावे.
२) नॉनस्टिक तव्याला तूप लावून घ्यावे. हाताला चिकटू नये म्हणून हातालाही थोडेसे तूप लावावे. हाताने एकसारखे थालीपिठ थापावे. मध्याभागी तेल सोडायला बोटाने छिद्रं करावे.
३) मिडीयम आणि हायच्या मध्ये गॅस अडजस्ट करावा. झाकण ठेवून थालीपीठ शिजू द्यावे. मिनिटभराने झाकण काढून कडेने तूप सोडावे. झाकून एक बाजू नीट शिजू द्यावी. कालथ्याने उलथून, झाकण ठेवून दुसरी बाजूही शिजवावी.
गरमगरम थालीपीठ वाढताना दही आणि लिंबाचे गोड लोणचे बरोबर खायला द्यावे.

टीप:
१) दुधी बिनबियांचा आणि कोवळा असावा, म्हणजे किसायला सोपा जातो.
२) थालीपिठ शिजायला वेळ लागतो. जास्त थालीपीठं बनवताना वेळ वाचवण्यासाठी दोन शेगड्यावर दोन तवे वापरून थालीपीठं बनवावी.
३) काहीजण दुधी भोपळा उपवासाला खात नाहीत. म्हणून दुधीऐवजी काकडी किसून घालावी.

Tuesday, June 14, 2011

नाचणीचे डोसे - Raagi flour dosa

Nachni flour dosa in English

वेळ: ३० मिनिटे
१२ ते १५ मध्यम डोसे

dosa recipe, Indian dosa recipe, raagi flour dosa, nachni pithache dose, healthy breakfast recipe
साहित्य:
१ कप नाचणीचे पीठ
१/२ कप तांदुळाचे पीठ
१/२ कप उडीद डाळ
७ ते ८ मेथी दाणे
चवीपुरते मीठ
डोसा बनवताना थोडे तेल

कृती:
१) नाचणीचे पीठ आणि तांदुळाचे पीठ पाण्यात किमन ५ तास भिजवावे. खूप जास्त पाणी घालू नये बटाटा वड्याच्या पिठाला भिजवतो तसे घट्टसर भिजवावे. दुसऱ्या भांड्यात उडीद डाळ आणि मेथी दाणे एकत्र करून ५ तास भिजत ठेवावे.
२) ५ तासानंतर उडीद डाळीतील पाणी काढून मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करावी. लागल्यास किंचित पाणी घालावे. आता भिजवलेले पीठ आणि उडीद डाळीची पेस्ट एकत्र करावी. लागेल तसे पाणी घालून नेहमीच्या डोसा पिठाला जेवढं पातळ पीठ असते तेवढे पातळ ठेवावे. चवीपुरते मीठ घालावे.
३) नॉनस्टिक तवा गरम करून त्यावर डावभर पीठ घालावे आणि डाव गोलगोल फिरवून डोसा पातळसर पसरवावा. कडेने तेल सोडावे. एक बाजू खरपूस झाली कि डोसा उलटून दुसऱ्या बाजूने निट भाजू द्यावा.
गरम गरम डोसे चटणी बरोबर सर्व्ह करावे.

टीपा:
१) डोसे छान पातळ पसरले गेले पाहिजेत, म्हणून डोशाचे पीठ पातळ ठेवावे. तसेच प्रत्येक वेळी डोसा बनवताना पीठ ढवळून घ्यावे, कारण डोशाचे पीठ स्थिर राहिले कि नाचणीचे पीठ तळाला बसते.
२) हे डोसे सकाळच्या न्याहारीला छान लागतात. म्हणून रात्रभर पीठ आणि डाळ भिजवून सकाळी डाळ वाटून लगेच डोसे बनवता येतात.
३) डोसे दोन्ही बाजूंनी नीट भाजावेत. कारण नाचणीचे पीठ जरा जरी शिजले नाही तर कचकचीत लागते.
४) डोसे बनवताना आवडीनुसार कोथिंबीर, मिरची, कांदा, टोमॅटो घालू शकतो.

Thursday, February 10, 2011

स्टफ पनीर पराठा - Stuffed Paneer Paratha

Stuffed Paneer Paratha in English

वेळ: ४० मिनीटे
नग: ६ ते ८ मध्यम पराठे

paneer paratha, paneer stuffed paratha, stuffed paneer paratha, paratha recipes, punjabi paratha recipes, Indian paratha recipes, indian paneer cheese, cottage cheese recipesसाहित्य:
स्टफिंग
२ कप किसलेले पनीर
३-४ हिरव्या मिरच्या, एकदम बारीक चिरून किंवा पेस्ट करून
१/४ कप कोथिंबीर, बारीक चिरून
१/२ टिस्पून जिरेपूड, १ टिस्पून धणेपूड, १/२ टिस्पून आमचूर पावडर, १/२ ते १ टिस्पून किसलेले आले
चवीपुरते मिठ
आवरणासाठी
३/४ कप मैदा
१ कप गव्हाचे पिठ
१/४ टिस्पून जिरे, १/४ टिस्पून हळद, १/४ टिस्पून लाल तिखट
१/४ कप दही
गरजेनुसार पाणी
२ टेस्पून तेल
२ टेस्पून कोथिंबीर, बारीक चिरलेली
१/२ टिस्पून मिठ
इतर साहित्य
बटर किंवा तेल पराठे भाजण्यासाठी
पराठे लाटायला थोडे कोरडे पिठ

कृती:

१) किसलेले पनीर एका बोलमध्ये घ्यावे. त्यात मिरची, कोथिंबीर, धणे-जिरेपूड, आमचूर, आलं आणि मिठ घालून हलक्या हाताने मिक्स करावे.
२) बाहेरील कव्हरसाठी मैदा, कणिक, जिरे, हळद, लाल तिखट, दही, कोथिंबीर, तेल आणि मिठ घालून मिक्स करावे. गरजेनुसार पाणी घालून मध्यमसर मळून घ्यावे. १५ मिनीटे झाकून ठेवावे.
३) कणकेचे ६ किंवा ८ समान गोळे करावेत. मिश्रणाचेसुद्धा तितकेच समान भाग करावेत.
४) कणकेचा १ गोळा ३ ते साडेतीन इंचाचा लाटून घ्यावा. त्याच्या मध्यभागी १ भाग मिश्रणाचा ठेवावा. सर्व बाजू एकत्र वरती आणाव्यात आणि गोळा बंद करावा. थोड्या पिठावर लाटून तेलावर किंवा बटरवर दोन्ही बाजूंनी भाजून घ्यावा.
गरमागरम पराठे चटणीबरोबर सर्व्ह करावे.

टीपा:
१) कोथिंबीरीबरोबर आवडत असल्यास पुदीन्याची पाने बारीक चिरून घातली तरी छान स्वाद लागतो.
२) जिरे घालण्याऐवजी ओवा घातला तरी चांगली चव येते.

Thursday, January 13, 2011

ज्वारीची भाकरी - Jwarichi chi Bhakari

Jowar Bhakari in English

वेळ: २५ मिनीटे
वाढणी: ४ ते ५ मध्यम भाकर्‍या

bhakri, bhakari, millet roti, jwarichi bhakri, indian roti recipeसाहित्य:
२ कप ज्वारीचे पिठ
अंदाजे दिड ते दोन कप गरम पाणी
१ टेस्पून लोणी किंवा तूप
१/४ टिस्पून मिठ
१/२ ते पाऊण कप ज्वारीचे पिठ भाकरी थापायला किंवा लाटायला

भोगीची भाजी रेसिपी

कृती:
१) पातेल्यात पाणी गरम करून त्यात १ टेस्पून लोणी सोडावे. पाणी चांगले गरम झाले कि परातीत ज्वारीचे पिठ आणि मिठ घालून मिक्स करावे. त्यात पाणी बेताबेताने ओतावे. हळू हळू मिक्स करून मळावे. पिठ चांगले मळले गेले पाहिजे.
२) मळलेल्या पिठाचे ४ किंवा ५ गोळे करावे व लगेच भाकरी करण्यास घ्यावी.
३) तवा गरम झाला कि गॅस मिडीयम हाय हिटवर ठेवावा. मळलेल्या पिठाचा गोळा कोरड्या पिठात बुडवून हलक्या हाताने लाटावा (टीप १). लागल्यास अजून थोडे कोरडे पिठ घ्यावे. भाकरी मध्यमसर जाड ठेवावी.
४) भाकरी तव्यावर टाकावी. वरच्या बाजूने हाताने किंवा सुती कापडाने पाणी लावावे. पाणी सुकत आले कि भाकरी पलटावी व दुसर्‍या बाजूने भाजावी. (महत्त्वाची टीप २)
गरमागरम भाकरीवर लोणी घालून झुणका, पिठलं किंवा वांगं-बटाटा-कांदा अशा मिक्स रस्सा भाजीबरोबर छान लागते.

टीप:
१) भाकरी थापूनही करू शकतो. पिठाचा गोळा थोड्या जास्त पिठावर हलके हलके थापावा व भाकरी वाढवत न्यावी.
२) माझ्या घरी इलेक्ट्रिक स्टोव्ह कॉईल असल्याने आचेवर भाजता येत नाही. पण घरी विस्तवाची (flame) शेगडी असेल तर भाकरीची एक बाजू तव्यावर शेकावी. दुसर्‍या बाजूला लावलेले पाणी सुकले कि फुलके भाजायच्या चिमट्याने दुसरी बाजू थेट आचेवर ठेवावी. चिमट्याच्या मदतीने थोडी गोलगोल फिरवावी म्हणजे जळणार नाही.
३) भोगीच्या दिवशी भोगीची भाजी आणि ज्वारी/बाजरीची भाकरी खातात. भाकरीवर तिळ लावून भाकरी भाजतात. भाकरी लाटताना/ थापताना वरून तिळ पेरावे आणि मग लाटावी/ थापावी.

Wednesday, June 23, 2010

नान - Naan Bread

Naan Bread in English

४ ते ५ मध्यम नान
वेळ: फर्मेंटेशनसाठी - साधारण १ ते दिड तास । नान बनवण्यासाठी १० ते १५ मिनीटे

garlic naan recipe, tandoori naan, indian naan recipe, how to make naanसाहित्य:
२ कप मैदा
१ टिस्पून ड्राय यिस्ट
१/४ कप दही (महत्त्वाची टीप १)
१/४ कप कोमट पाणी
१/२ टिस्पून साखर
चवीपुरते मिठ (साधारण १/२ ते १ टिस्पून)
२ ते ३ टेस्पून तेल

naan, bread naan, naan bread, naan bread recipeकृती:
१) कोमट पाण्यात थोडी साखर मिक्स करून घ्यावी. त्यात ड्राय यिस्ट घालून व्यवस्थित ढवळावे. झाकण ठेवून १० मिनीटे उबदार ठिकाणी ठेवावे. १०-१५ मिनीटात यिस्ट घातलेले पाणी फेसाळेल.
२) मैदा एका मिक्सिंग बाऊलमध्ये घेऊन त्यात मिठ घालावे. यिस्टचे पाणी घालून मिक्स करावे. १/४ कप दही घालून मळावे. जर लागले तर पिठ मळायला अजून कोमट पाणी वापरावे. पिठ एकदम सैल मळून घ्यावे. हाताला तेल लावून निट मळून घ्यावे. मळलेल्या पिठाचा व्यवस्थित गोळा करावा आणि वरून थोडा तेलाचा मुलामा करावा. वरती झाकण ठेवून उबदार ठिकाणी साधारण १ तासभर ठेवावे म्हणजे पिठ चांगले फुलून येईल.
३) तासाभरानंतर फुललेले पिठ परत एकदा मळून घ्यावे. ओव्हन ब्रॉइलवर गरम करावे. बेकिंग ट्रेला थोडे तेल लावावे. हाताला थोडे तेल लावून पिठाचे ४ ते ५ समान गोळे करावे. कोरडे पिठ घेऊन नान लाटावे. आणि बेकिंग ट्रेवर ठेवावे. एका बेकिंग ट्रेवर साधारण २ नान राहतील.
४) ट्रे वरच्या रॅकवर ठेवावा. एका बाजूला दिड मिनीट ठेवावे आणि लागल्यास अर्धा मिनीट अजून ठेवावे. ब्राऊन स्पॉट्स आल्यावर ट्रे बाहेर काढावा. नान दुसर्‍या बाजूला पलटावे आणि साधारण १ मिनीटभर बेक करावे.
बटर अँड सेसमे नान
गरमागरम नानवर बटर चोळून त्यावर भाजलेले तिळ पेरावेत आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. आणि लगेच सर्व्ह करावे.
गार्लिक नान
नान बेक करायच्या आधीच २ टेस्पून बटर आणि ३ ते ४ लसणीच्या पाकळ्यांची पेस्ट एकत्र करावी. नान ओव्हनच्या बाहेर काढल्यावर लगेच चमचाभर गार्लिक बटर नानवर लावावे. आणि गरमागरम सर्व्ह करावे.

पंजाबी पद्धतीच्या भाज्या तसेच इतर रेसिपीज साठी इथे क्लिक करा.

टीप:
१) फ्रिजमधील गार दही वापरू नये यामुळे मळलेले पिठ तासाभरात फुलून येत नाही. तेव्हा पिठ मळताना थोडे गरम पाणी वापरावे.

Tuesday, April 13, 2010

फोडणीची पोळी - Phodnichi Poli

Phodanichi Poli in English

२ ते ३ जणांसाठी
वेळ: १५ मिनीटे

phodnichi poli, leftover chapati snack, quick breakfastसाहित्य:
७ ते ८ पोळ्या (आदल्या दिवशीच्या)
फोडणीसाठी: २ टिस्पून तेल, चिमूटभर मोहोरी, १/४ टिस्पून जिरे, चिमूटभर हिंग, १/४ टिस्पून हळद, १/२ टिस्पून लाल तिखट, २ कढीपत्ता पाने
१/४ कप कांदा, बारीक चिरलेला
२ टेस्पून तळलेले शेंगदाणे
१/२ टिस्पून लिंबाचा रस
चवीपुरते मिठ
२ चिमटी साखर
सजावटीसाठी चिरलेली कोथिंबीर

कृती:
१) आदल्या दिवशीच्या पोळ्या मिक्सरमध्ये बारीक करून घ्याव्यात.
२) कढईत २ टिस्पून तेल गरम करावे. त्यात मोहोरी, जिरे, हिंग, हळद, तिखट आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी. त्यात कांदा घालून परतावे. शेंगदाणे घालावे.
३) तयार फोडणीत मिक्सरमध्ये बारीक केलेल्या पोळ्या घालाव्यात आणि मध्यम आचेवर परतावे. मिठ आणि साखर घालून २ मिनीटे मंद आचेवर वाफ काढावी.
फोडणीची पोळी तयार झाली कि लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालून घालून गरमच सर्व्ह करावे.

टीप:
१) जर पोळ्या मिक्सरमध्ये बारीक करायची नसेल तर हातानेच बारीक तुकडे करूनही फोडणीस घालून शकतो.
२) फोडणीच्या पोळीबरोबर दही आणि लोणचे खुप छान लागते.
३) फोडणीची पोळी जर थोडी नरम पाहिजे असेल तर वाफ काढताना थोड्या ताकाचा हबका मारावा.
४) फोडणीमध्ये थोडे मटार घातल्यास फोडणीची पोळी छान लागते.

Labels:
Phodanichi poli, phodnichi poli, leftover chapati snack

Thursday, April 8, 2010

टोफू पराठा - Tofu Paratha

Tofu Paratha in English

वेळ: पिठ मळण्यासाठी: १० मिनीटे । पराठे बनवण्यासाठी: १५ मिनीटे
६ ते ७ मोठे पराठे (१० इंच प्रत्येकी)

tofu recipes, paratha recipe, tofu paratha, Parathas with Tofu,Indian Bread Recipeसाहित्य:
१५० ग्राम टोफू (मी फर्म टोफू वापरला होता) (टीप १)
१ गाजर, किसलेले
दिड ते दोन कप कणिक (टीप २)
दही (टीप ३)
१/२ कप बारीक चिरलेली कोथिंबीर
३ ते ४ हिरव्या मिरच्या, एकदम बारीक चिरून
१ टिस्पून धणेजिरे पूड
१/४ टिस्पून हळद
चिमूटभर हिंग
चवीपुरते मिठ
पराठे भाजण्यासाठी तेल (साधारण १/४ कप)

कृती:
१) टोफू हलक्या हाताने दाबून त्यातील पाणी काढून टाकावे. परातीत किंवा खोलगट भांड्यात घेऊन टोफू कुस्करून घ्यावा.
२) त्यात कणिक घालून हलकेच मिक्स करावे. नंतर किसलेलेल गाजर मिरच्या, धणेजिरेपूड, हळद, हिंग, मिठ, कोथिंबीर घालावे चांगले मळावे आणि गरजेप्रमाणे दही घालून पराठ्यासाठी कणिक मळून घ्यावी. खुप घट्ट मळू नये त्यामुळे पराठे कोरडे होवू शकतात.
३) मळलेले पिठ १० मिनीटे झाकून ठेवावे. नंतर तेलाचा हात घेऊन २ ते अडीच इंचाचे समान गोळे बनवावे. तवा गरम करावा. कोरडी कणिक लावून पराठे लाटावेत आणि मध्यम आचेवर पराठे भाजून घ्यावेत. पराठे भाजताना कडेने थोडे तेल किंवा बटर घालावे त्यामुळे खमंग स्वाद येतो आणि पराठे मऊ राहतात.

टीप:
१) या पराठ्यांसाठी फर्म टोफू किंवा सिल्कन टोफू, कोणताही प्रकार वापरला तरी चालेल. घरी फर्म टोफू अव्हेलेबल होता म्हणून मी तोच वापरला. सिल्कन टोफू टेक्श्चरला एकदम मऊसूत असतो. म्हणून जर तुम्ही पराठे बनवण्यासाठी खास टोफू आणणार असाल तर शक्यतो सिल्कन टोफू आणा.
२) दही, टोफू यांच्यातील पाण्याच्या अंशानुसार गव्हाचे पिठ थोडे कमी किंवा जास्त लागू शकते.
३) टोफूच्या टेक्श्चरवर दह्याचे प्रमाण अवलंबून आहे. वरील प्रमाणानुसार मला साधारण ३ टेस्पून दही लागले होते.
३) टोफूऐवजी पनीर वापरले तरीही छान चव येते.

Labels:
Tofu recipe, Tofu Paratha, Paratha recipe

Monday, April 5, 2010

घडीच्या पोळ्या - Ghadichya Polya

Ghadichya Polya in English

वेळ: १५ ते २० मिनीटे
५ ते ६ पोळ्या



साहित्य:
१ कप पिठाची मळलेली कणिक (५ ते ६ मध्यम गोळे)
थोडे तेल
१/२ कप कणकेचे कोरडे पिठ

कृती:
१) तवा गरम करण्यास ठेवावा. कणकेचा एक गोळा घेऊन हाताने चपटा करावा. थोडे पिठ लावून ३ ते ४ इंच व्यासाची पुरी लाटावी. त्यावर थोडे तेल पसरवावे. आणि किंचीत कोरडे पिठ भुरभुरावे.
२) नंतर एक घडी करून अर्धगोल तयार करावा. त्यावरही थोडा तेलाचा हात आणि कोरडे पिठ भुरभुरावे. आणि परत घडी करावी. आता आकार त्रिकोणीसर झाला असेल. एका कोनावर लाटणे फिरवून पोळी गोलसर लाटावी. लागल्यास थोडे कोरडे पिठ लावावे.
३) पोळी नेहमीप्रमाणे तव्यावर भाजून घ्यावी.
पोळी भाजली गेली कि तव्यावरून काढून थोडी चुरगाळून घ्यावी यामुळे पोळीचे छान पदर सुटतील. तेल किंवा पातळ तूप लावून गरम सर्व्ह कराव्यात किंवा डब्यात भराव्यात.
अशाप्रकारे सर्व पोळ्या भाजून घ्याव्यात.

टीप:
१) घडीच्या पोळ्या करताना वरील कृतीप्रमाणे आतमध्ये तेल आणि पिठ लावून सर्व त्रिकोण तयार करून घ्यावेत. आणि मग पोळ्या लाटून भाजाव्यात म्हणजे पोळ्या करताना जास्त वेळ मोडणार नाही.

Labels:
Poli, Chapati, Ghadichya Polya, Roti, Indian Flat bread

Thursday, April 1, 2010

पोळ्या - Chapati

Chapati in English

साधारण ५ ते ६ मध्यम आकाराच्या पोळ्या
वेळ: १० ते १५ मिनीटे

साहित्य:
१ कप पिठाची मळलेली कणिक
थोडे तेल किंवा तूप
१/२ कप गव्हाचे कोरडे पिठ

कृती:
१) कणकेचे ५ ते ६ मध्यम गोळे करून घ्यावे. तवा गरम करून आच मिडीयम हायवर ठेवावी.
२) एक गोळा घेऊन हाताच्या तळव्यांनी चपटा करून घ्यावा. कोरड्या पिठात बुडवून पातळ पोळी लाटून घ्यावी.
३) लाटलेली पोळी तव्यावर टाकून लगेच ५ ते ६ सेकंदात दुसर्‍या बाजूला उलटावी. हि बाजू ब्राऊन डाग येईस्तोवर भाजावी. पोळी निट आणि सर्व ठिकाणहून भाजण्यासाठी सुती कपड्याने वरून हलकेच दाब द्यावा.
४) एक बाजू भाजली गेली कि दुसरी बाजूसुद्धा व्यवस्थित भाजावी.
पोळी भाजली गेली कि तव्यावरून काढून तेल किंवा पातळ तूप लावून गरम सर्व्ह कराव्यात किंवा डब्यात भराव्यात.
अशाप्रकारे सर्व पोळ्या भाजून घ्याव्यात.

टीप:
१) जर तुम्ही थंड प्रदेशात राहात असाल आणि जर टिफीनसाठी पोळ्या करायच्या असतील तर शक्यतो तुप लावू नये, तेल लावावे. थंडीमुळे तूप गोठते.
२) सर्व पोळ्या लाटून ठेवून भाजल्यास पोळ्या कडक होतात.
३) जास्त पोळ्या बनवून जर डब्यात भरणार असाल तर पोळीच्या डब्यात पंचा किंवा कॉटनचा स्वच्छ कपडा लावून त्यात पोळ्या ठेवाव्यात आणि पोळ्या बनवून झाल्या कि पंचाची उरलेली टोके एकत्र आणून पोळ्या कव्हर कराव्यात वरून डब्याचे झाकण लावावे.
४) पोळ्या नरम होण्यासाठी चांगल्या प्रतीचे गव्हाचे पिठ, गरजेपुरते तेल आणि पाण्याचे प्रमाण महत्त्वाचे असते तसेच कणिक व्यवस्थित मळलेली असावी.
५) पोळ्या आपल्या आवडीनुसार जाड किंवा पातळ लाटाव्यात. फक्त सर्व ठिकाणहून सारख्या लाटल्या गेल्या पाहिजेत.
६) तवा व्यवस्थित (मिडीयम हाय) तापलेला असला पाहिजे. खुप जास्त तापला असेल तर पोळ्या करपतात आणि कमी तापला असेल तर पोळ्या कच्च्या राहतात तसेच कडक होतात.
७) पोळीसाठी शक्यतो बिनकाठाचा तवा वापरावा. पण जर तसे शक्य नसेल तर पोळ्यांच्या आकारापेक्षा मोठा तवा किंवा पॅन वापरावा.

Labels:
Chapati, roti, wheat flour roti, polya, kanakechi poli, fulka

Thursday, March 25, 2010

पोळ्यांची कणिक - Dough for Chapati

Dough for Chapati in English


साहित्य:
१ कप कणिक
१ टिस्पून तेल + अजून थोडे तेल
चिमूटभर मिठ
कोमट पाणी

कृती:
१) कणकेमध्ये तेल आणि मिठ घालून निट मिक्स करावे. कोमट पाण्याने कणिक मऊसर मळून घ्यावी. लागल्यास थोडे तेल घेऊन कणिक व्यवस्थित तिंबून काढावी.
२) १० मिनीटे मळलेली कणिक झाकून ठेवावी. नंतर परत एकदा मळून घ्यावी. मळलेल्या कणकेचे ६ मध्यम गोळे करून घ्यावे.

टीप:
१) कणिक खुप घट्ट मळू नये, पोळ्या कडक होतात. तसेच एकदम सैलही मळू नयेत. यामुळे लाटताना पोळी हाताळणे कठिण होते.
२) पोळ्यांची संख्या हि पोळीच्या आकारावर आणि जाडीवर (thickness) वर अवलंबून आहे.

Labels:
Chapati, roti, dough for chapati, Wheat flour atta.

Thursday, September 17, 2009

पुदीना कोथिंबीर पराठा - Pudina Paratha

Pudina Paratha in english

pudina paratha, paratha recipe, punjabi parathaसाहित्य:
२ कप गव्हाचे पिठ
१/४ कप पुदीना पाने, बारीक चिरून
१/४ कप कोथिंबीर, बारीक चिरून
२ मिरच्या, एकदम बारीक चिरून
१/२ टिस्पून जिरे
१/२ टिस्पून ओवा
१/२ कप दही
१ टेस्पून चाट मसाला
१ टिस्पून गरम मसाला
चवीपुरते मिठ
३ टेस्पून तेल + पराठे भाजण्यासाठी तेल

कृती:
१) परातीत गव्हाचे पिठ, पुदीना, कोथिंबीर, मिरची, जिरे, ओवा, २ टेस्पून तेल आणि चवीपुरते मिठ घालून मिक्स करावे. दही घालून छान मळून घ्यावे. प्लेन गोळा बनवून त्याला बाहेरून तेलाचा हात लावावा म्हणजे पिठ सुकणार नाही. साधारण १/२ तास झाकून ठेवावे.
२) मळलेल्या पिठाचे साधारण ६ गोळे करून घ्यावे. पातळ पोळी लाटून त्यावर थोडे तेल लावावे. त्यावर थोडा चाट मसाला आणि गरम मसाला भुरभूरावा. हातातील उघडझाप करणार्‍या पंख्यासारख्या घड्या घालाव्यात. सर्व लेयर्स वर दिसतील अशाप्रकारे धरावे. नंतर एक टोक हातात धरून दुसरे टोक पहिल्य़ा टोकाभोवती फिरवावे आणि घट्ट रोल करावा. सर्व लेयर्स वर दिसले पाहिजेत.
३) थोडे पिठ भुरभूरवून परत लाटावे. गरम तव्यावर दोन्ही बाजूंनी शेकावे. भाजताना थोडे तेलही घालावे. पराठा तयार झाला कि दोन्ही हातात धरून अगदी अलगद चुरगाळावा म्हणजे सर्व लेयर्स व्यवस्थित सुटतील. जोरात चुरगळू नये.
स्टेप २ सोपी करण्यासाठी खाली दिलेला व्हिडीओप्रमाणे पराठा तयार करावा.


मध्यम आकाराचे पराठे बनवावेत. गरमागरम पराठे दही आणि लोण्याबरोबर सर्व्ह करावे.

टीप:
१) डाएट पराठा करण्यासाठी तेल न घालता पराठा बनवावा. फक्त हा पराठा किंचीत कोरडा होतो.

Thursday, August 27, 2009

नारळाच्या पोळ्या - Naralachya Polya

Coconut Roti in English

५ ते ६ लहान पोळ्या
वेळ: ३० मिनीटे (सारण तयार असल्यास)

Naralachya Polya, naral poli, coconut jaggery rotiसाहित्य:
दिड कप ताजा खवलेला नारळ
पाऊण कप किसलेला गूळ
१/२ टिस्पून वेलचीपूड
१/४ कप गव्हाचे पिठ
१/४ कप मैदा
चिमूटभर मिठ
२ टिस्पून तेल
२ टेस्पून तूप

कृती:
१) नारळ आणि गूळ एकत्र करून मध्यम आचेवर घट्टसर होईस्तोवर (साधारण १० ते १५ मिनीटे) ढवळावे, वेलचीपूड घालावी. गार झाले कि बंद डब्यात ठेवून २ ते ३ तास फ्रिजमध्ये ठेवावे (टीप १).
२) मैदा आणि गव्हाचे पिठ एकत्र करावे. २ टिस्पून कडकडीत गरम तेलाचे मोहन घालावे. १ चिमूटभर मिठ घालून ढवळावे. पाणी घालून घट्टसर मळून घ्यावे. १/२ तास झाकून ठेवावे.
३) नारळाच्या मिश्रणाचे दिड इंचाचे गोळे करावे. साधारण ५ ते ६ गोळे होतील. तेवढेच भिजवलेल्या कणकेचे गोळे करावे.
४) कणकेच्या लाटीची पुरी लाटावी. मधे नारळाचा गोळा ठेवून पुरीच्या सर्व बाजू एकत्र आणून बंद करावे. थोडा मैदा भुरभूरवून पोळी लाटावी.
५) तवा गरम करून तूपावर खरपूस भाजून घ्याव्यात. गॅस मध्यम ठेवावा.
जरा कोमट झाल्या कि खाव्यात. गार झाल्यावरही छान लागतात तसेच ३-४ दिवस टिकतात.

टीप:
१) मिश्रण फ्रिजमध्ये ठेवल्याने घट्ट बनते, पोळी लाटताना सोपे पडते.
२) जर कधी उकडीच्या मोदकाचे सारण उरले असेल तर त्याच्याही पोळ्या बनवता येतात.

Labels:
Coconut Roti, Naralachya polya, coconut recipe, coconut sweets.

Thursday, July 16, 2009

रव्याचे धिरडे - Ravyache Ghavan

Rava Ghavan in English

८ ते १० लहान घावन
वेळ: २० मिनीटे (पिठ भिजवून तयार झाल्यावर)

साहित्य:
१ कप रवा
३/४ कप दही
१/२ कप पाणी
१/२ कप कांदा, बारीक चिरलेला
१/२ कप टोमॅटो, बारीक चिरून
२ हिरव्या मिरच्या, बारीक चिरून
१/२ टिस्पून जिरे
१/२ टिस्पून आलेपेस्ट
१/४ कप कोथिंबीर, बारीक चिरून
चवीपुरते मिठ
चिमूटभर बेकींग सोडा (खायचा सोडा)
१/४ कप तेल

कृती:
१) दही आणि पाणी एकत्र करून घट्ट ताक बनवून घ्यावे. त्यात रवा घालून मिक्स करावे. लागल्यास अजून थोडे ताक घालावे. मिश्रण पातळ नको आणि खुप घट्टही नको. मिश्रण एक दिड तास झाकून ठेवून दयावे.
२) एक दिड तासांनंतर त्यात कांदा, टोमॅटो, मिरच्या, आलेपेस्ट, जिरे, कोथिंबीर, मिठ आणि बेकींग सोडा घालून मिक्स करावे.
३) नॉनस्टिक तव्यावर तेल सोडून गरम करावा. तवा गरम झाला कि १ डाव मिश्रण घालावे, फक्त पळीने पसरू नये, घावन जाडसरच ठेवावे. मिडीयम हाय फ्लेमवर तव्यावर झाकण ठेवून शिजू द्यावा. एक बाजू शिजली कि थोडे तेल घालून दुसरी बाजू भाजून घ्यावी.

गरमच असताना खावे. नारळाच्या चटणीबरोबर सर्व्ह करावे.

Labels:
Rava uttappa, Rava Ghavan, Semolina Pancakes

Tuesday, June 16, 2009

पोळीचा लाडू - Policha Ladu

Policha Ladu in English

साधारण ४ ते ५ लाडू
कृतीला लागणारा वेळ: ५ मिनीटे

policha ladu, policha ladoo, chapathi laddu, chapati ladu, chapati ladoo, leftover chapati ladoo, shilya poliche laduसाहित्य:
४ ते ५ आदल्या दिवशीच्या पोळ्या
२ टेस्पून किसलेला गूळ, किंवा चवीनुसार
२ टेस्पून साजूक तूप

कृती:
१) पोळ्यांचा कुस्करा करून मिक्सरमध्ये भरडसर फिरवून घ्यावे.
२) त्यात गूळ आणि तूप घालून चांगले मळावे. गूळ, तूप आणि मिक्सरमध्ये बारीक केलेली पोळी हे चांगले मिक्स झाले पाहिजे. या मिश्रणाचे छोटे छोटे लाडू वळावेत.

टीप:
१) काहीजणांना पोळ्या मिक्सरमध्ये बारीक केलेल्या आवडत नाही. अशावेळी पोळीचा बारीक कुस्करा करून त्याचे लाडू बनवावेत.
२) या लाडूंमध्ये ड्रायफ्रुट्सची भरडसर पूड आवडत असल्यास घालू शकतो. तसेच शोभेकरता बेदाणेही लावू शकतो.

Another recipe from leftover Chapati - Quesadilla

Labels:
Policha Ladu, chapata ladu, leftover chapati ladu

Thursday, June 4, 2009

पालक पनीर पराठा - Palak Paneer Paratha

Palak Paneer Paratha in English

६ ते ८ मध्यम पराठे

Palak Paneer Paratha aloo palak parathaसाहित्य:
दिड कप कणिक
१ कप बारीक चिरलेला पालक
१/२ कप किसलेले पनीर
१/४ कप कांदा
१/२ कप दही
१ टिस्पून जिरेपूड
२ टिस्पून पुदीना चटणी किंवा
७ ते ८ पुदीना पाने + १/४ कप कोथिंबीर + १ लसूण पाकळी + २ लहान हिरव्या मिरच्या, सर्व बारीक चिरून किंवा बारीक वाटून
चवीपुरते मिठ
१ टिस्पून चाट मसाला
१/२ टिस्पून गरम मसाला
१ टेस्पून तेल
तूप किंवा बटर पराठे भाजण्यासाठी

punjabi paratha, butter paratha, oil free recipe, oil free paratha recipe, paratha recipe, palak paratha, aloo parathaकृती:
१) कणिक एका मोठ्या वाडग्यात घ्यावी त्यात चिरलेला पालक, किसलेले पनीर, कांदा, मिठ, चाट मसाला, गरम मसाला, जिरेपूड, पुदीन्याचे मिश्रण आणि तेल असे सर्व घालून मिक्स करावे. हे कणकेचे मिश्रण सुकेच मळावे.
२) नंतर यात दही घालून कणिक मळून घ्यावी. दही अंदाज घेत चमचा-चमचा घालावे आणि मळावे. मला साधारण १/२ कप दही लागले होते कणिक मळायला. मळलेले पिठ १/२ तास झाकून ठेवावे.
३) मळलेल्या कणकेचे साधारण ८ समान गोळे करावेत व गोल लाटून तव्यावर तूप किंवा बटरवर भाजावेत.
गरम पराठ्यावर लोणी घालावे आणि पुदीना चटणी, टोमॅटो सॉस किंवा कोणत्याही लोणच्याबरोबर पराठा सर्व्ह करावा.

टीप:
ऑईल फ्री वर्जन किंवा लो कॅलरी वर्जन:
१) हे पराठे ऑईल फ्री वर्जनमध्ये सुद्धा छान लागतात. कृती वरीलप्रमाणेच फक्त कणिक मळताना तेल घालू नये. तसेच पराठे कोरडेच भाजावेत तूप, तेल किंवा बटरचा वापर टाळावा.
२) दही वापरताना ’फॅट फ्री योगर्ट’ वापरावे. तसेच फॅट फ्री मिल्क पासून बनवलेले पनीर वापरावे.

Labels:
Paneer Paratha, Palak Paneer Paratha, Palak Paratha, Spinach Paratha

Tuesday, March 24, 2009

पुरी - Puri

Puri in English

साधारण १५ ते २० मध्यम पुर्‍या

puri bhaji, wheat flour puri, Indian fried flat bread, shrikhand puri
साहित्य:
१ कप गव्हाचे पिठ
१ टेस्पून बेसन पिठ
१ टेस्पून रवा
१/२ टिस्पून मिठ किंवा चवीनुसार
१ टेस्पून तेल
तेल तळणीसाठी
ओला, पिळून घेतलेला कपडा, मळलेला गोळा झाकण्यासाठी

कृती:
१) एका वाडग्यात गव्हाचे पिठ, बेसन पिठ, रवा, आणि मिठ एकत्र मिक्स करावे. कढल्यात १ टेस्पून तेल गरम करून, गरम तेलाचे मोहन मिक्स केलेल्या पिठांत घालावे. दोन मिनीटे थांबावे.
२) मिसळलेल्या पिठात पाणी घालून मध्यमसर मळून घ्यावे. १० मिनीटे मळलेली कणिक झाकून ठेवावी.
३) १० मिनीटांनी परत एकदा भिजवलेली कणिक मळून घ्यावी. नंतर कणकेचे २ सेमीचे एकसारखे गोळे करून घ्यावे. तुमच्या आवडीनुसार मोठे गोळे करून मोठ्या पुर्‍यासुद्धा करता येतील, पण फक्त गोळे एकसारखे करा म्हणजे पुर्‍यांचा आकार एकसारखा येईल.
४) तेल तापत ठेवावे. त्यावेळात पुर्‍या लाटाव्यात. जमतील तेवढ्या पुर्‍या लाटून त्यावर ओला कपडा ठेवावा म्हणजे पुर्‍या सुकणार नाहीत. पुर्‍या खुप जाड किंवा पातळ नसाव्यात. जाडी साधारण १ mm असावी. पुर्‍या लाटून सोनेरी रंगावर तळून घ्याव्यात.

Labels:
Puri, Shrikhand Puri, Poori bhaji

Wednesday, March 11, 2009

पुरणपोळी - Pooranpoli

Puranpoli in English

१० मध्यम पोळ्या
वेळ: २५ मिनिटे (पुरण व मैदा भिजवून तयार असल्यास)

Maharashtrian reccipe, Holi Spcial, Pooranpoli, Puranpoli, Sweets recipe, Healthy recipe
साहित्य:
१ कप चणाडाळ
१ कप किसलेला गूळ
एक कप मैदा
१/२ कप गव्हाचे पिठ
७ ते ८ टेस्पून तेल
१ टिस्पून वेलचीपूड


Maharashtrian reccipe, Holi Spcial, Pooranpoli, Puranpoli, Sweets recipe, Healthy recipe
कृती:
१) चणाडाळ कूकरमध्ये चणाडाळीच्या अडीचपट पाणी घालून शिजवून घ्यावे. डाळ शिजली कि त्यातील पाणी निथळू द्यावे. हे पाणी वापरून कटाची आमटी करता येते.
२) डाळीतील पाणी निघून गेल्यावर हि डाळ पातेल्यात घ्यावे. त्यात किसलेला गूळ घालावा. मध्यम आचेवर हे मिश्रण आटवावे. आटवताना ढवळत राहावे. जर ढवळायचे थांबवले मिश्रण पातेल्याला लागून करपू शकते. या पुरणात १ चमचा वेलचीपूड घालावी.
३) मिश्रण घट्टसर झाले कि पातेले गॅसवरून उतरवावे. मिश्रण जरा गार झाले कि पुरणयंत्रातून ते फिरवून घ्यावे. जर पुरणयंत्र नसेल तर मिक्सरमध्ये बारीक करावे.
४) मैदा आणि कणिक मिक्स करून त्यात ५-६ चमचे तेल घालावे. आणि सैलसर मळून घ्यावे. भिजवलेले पिठ १-२ तास मुरू द्यावे.
५) पुरणाचे दिड इंचाचे गोळे बनवून घ्यावे. मैद्याचा अर्धा ते एक इंचाचा गोळा घ्यावा व त्याची पातळसर पारी बनवून घ्यावी. त्यात पुरणाचा गोळा भरावा. सर्व बाजूंनी बंद करून घ्यावा.
६) पोळपाटावर थोडा मैदा भुरभुरवून हलक्या हाताने पोळी लाटून घ्यावी. तव्यावर खरपूस भाजून घ्यावी.
साजूक तूप घालून गरम गरम सर्व्ह करावी. या पोळ्या टिकाऊ असतात. आठ एक दिवस सहज टिकतात. थंड पोळ्या दूधाबरोबर छान लागतात.