Showing posts with label Eggplant. Show all posts
Showing posts with label Eggplant. Show all posts

Friday, September 9, 2011

दह्यातील वांग्याचे भरीत - Vangyache Bharit

Baigan Bhurta (in yogurt) in English

वेळ: १० मिनिटे
साधारण १ कप भरीत
vangyache bharit, baingan bharta, baingan bhurta, dahyatil vangyache bharitसाहित्य:
१ कप भाजलेल्या वांग्याचा गर
१/२ कप बारीक चिरलेला कांदा
१ टीस्पून तेल, १ चिमटी मोहोरी (ऐच्छिक) , २ चिमटी जिरे, १/४ टीस्पून हिंग
२ हिरव्या मिरच्या, उभ्या चिरून
२ ते ३ टेस्पून कोथिंबीर, बारीक चिरून
३/४ कप किंवा गरजेनुसार दही
चवीपुरते मीठ

कृती:
१) वांग्याचा गर सुरीने थोडा कापून घ्यावा. कढल्यात तेल गरम करावे. त्यात जिरे घालून तडतडेस्तोवर थांबावे. हिंग आणि हिरवी मिरची घालावी. तयार फोडणी वांग्यावर घालावी.
२) कांदा आणि मीठ घालून मिक्स करावे. दही आणि कोथिंबीर घालून मिक्स करावे.
जेवणात तोंडीलावणी म्हणून दह्यातील वांग्याचे भरीत छान लागते.

Tuesday, September 6, 2011

मसाला वांगी - Masala Vangi

Spicy Eggplant Curry in English

वेळ: ४० मिनिटे
वाढणी: ४ जणांसाठी

masala baingan, baingan recipes, eggplant recipes, masala vangi, vangyachee bhajiसाहित्य:
१० लहान वांगी
मसाला पेस्टसाठी:-
१ कप कांदा, पातळ उभा चिरलेला
१ मध्यम टोमॅटो, चिरलेला
५ मोठ्या लसूण पाकळ्या, बारीक चिरून
१ इंच आलं, बारीक चिरून
५ कढीपत्त्याची पाने
१ टेस्पून शेंगदाण्याचा कूट
४ हिरव्या मिरच्या, चिरून
२ टेस्पून खवलेला ताजा नारळ
१/२ टिस्पून खसखस, भाजून पूड केलेली (ऐच्छिक)
१/२ टिस्पून जिरेपूड
१ टिस्पून धणेपूड
१ टिस्पून गरम मसाला
चवीपुरते मिठ
३ टेस्पून तेल
इतर साहित्य:-
२ टिस्पून तेल
५ ते ६ मेथीचे दाणे
१/४ टिस्पून हिंग
१/४ टिस्पून हळद
१/२ टिस्पून काश्मिरी लाल तिखट (लालसर रंग येण्यासाठी)
२ टेस्पून चिंचेचा घट्ट कोळ

कृती:
१) वांग्याचे देठ कापून प्रत्येक वांग्याच्या ६ ते ८ फोडी कराव्यात.
२) मसाला पेस्ट
i) पॅनमध्ये तेल गरम करावे. त्यात कढीपत्ता, कांदा, हिरवी मिरची, लसूण, आणि आलं घालावे. कांदा पारदर्शक होईस्तोवर परतावे.
ii) टोमॅटो घालून ते एकदम मऊसर होईस्तोवर परतावे.
iii) दाण्याचा कूट, नारळ, धणे-जिरेपूड, खसखस, गरम मसाला आणि मिठ घालून मिक्स करावे.
iv) हे मिश्रण गार होवू द्यावे. थोडे पाणी घालून एकदम बारीक वाटून पेस्ट तयार करावी.
३) पॅनमध्ये तेल गरम करावे. मेथी दाणे घालून थोडा रंग बदलेस्तोवर थांबावे. नंतर हिंग, हळद, आणि वांग्याच्या फोडी घालाव्यात. थोडे मिठ घालावे. झाकण ठेवून फोडी थोडावेळ शिजू द्याव्यात. आता वाटलेला मसाला घालावा, चिंचेचा कोळ आणि लाल तिखट घालावे.
गरजेपुरते पाणी घालून कंसिस्टन्सी अड्जस्ट करावी. काही मिनीटे उकळी काढावी.
भात किंवा पोळीबरोबर सर्व्ह करावी.

टीपा
१) जांभळ्या रंगाची लहान वांगी निवडावीत. तसेच साल तुकतूकीत आणि डागविरहीत असावे.
२) काश्मिरी लाल तिखटाला तिखटपणा अगदी कमी असतो पण यामुळे भाजीला रंग सुरेख येतो. वाटल्यास हे तिखट घातले नाही तरी चालेल.
३) या भाजीत थोडा गोडपणा चांगला लागतो. आवडत असल्यास थोडा गूळ किंवा साखर घालावी. (१/२ किंवा १ टिस्पून)

Tuesday, August 2, 2011

वांगी बटाटा काचऱ्या - Vangi Batata Kacharya

Aloo Baingan Stir Fry in English

वेळ: २० मिनिटे
वाढणी: ३ जणांसाठी

aloo baingan, vangi batata kachrya,  batata kachrya, eggplant stir fry, healthy cookingसाहित्य:
८ ते १० लहान वांगी (टीप १)
२ मध्यम बटाटे
१/२ कप बारीक चिरलेला कांदा
फोडणीसाठी: २ टेस्पून तेल, चिमूटभर मोहोरी, १/८ टीस्पून हिंग, १/४ टीस्पून हळद, १/२ टीस्पून लाल तिखट
४ ते ५ कढीपत्ता पाने
२ टेस्पून शेंगदाण्याचा कूट
२ टेस्पून ताजा खोवलेला नारळ
चवीपुरते मीठ
१/२ टीस्पून साखर किंवा चवीनुसार

कृती:
१) वांगी धुवून घ्यावीत आणि देठं कापून टाकावीत. प्रत्येक वांग्याच्या उभ्या चार फोडी कराव्यात. आणि चतकोर आकाराच्या काचऱ्या कराव्यात. गार पाण्यात बुडवून ठेवाव्यात.
२) बटाटे सोलून उभे चार भाग करून पातळ काचऱ्या कराव्यात.
३) कढईत तेल गरम करावे. मोहोरी, हिंग, हळद, लाल तिखट आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी. कांदा आणि बटाटा घालावा. थोडे मीठ घालावे. झाकण ठेवून बटाटे ५०% शिजवावे.
४) वांग्यातील पाणी पूर्णपणे काढून टाकावे. वांग्याच्या काचऱ्या कढईत घालाव्यात. झाकण न ठेवता वांगी परतत राहावी. वांगी पटकन शिजतात, म्हणून कढईवर झाकण ठेवू नये.
५) वांगी शिजली कि चव पाहून लागल्यास मीठ घालावे. आता शेंगदाण्याचा कूट, साखर, आणि नारळ घालून मिक्स करावे. एक दोन मिनिटे भाजी परतावी आणि गरमच पोळीबरोबर किंवा आमटी भाताबरोबर वाढावी.

टीपा:
१) मोठे वांगेसुद्धा वापरता येईल. तेव्हा वांगं-बटाट्याचे प्रमाण १ कप वांग्याच्या काचऱ्यांना ३/४ कप बटाट्याच्या काचऱ्या असे असावे.
२) आंबटपणासाठी १ टीस्पून लिंबाचा रस भाजी तयार झाल्यावर शेवटी घालावा.

Thursday, March 24, 2011

वांग्याचे भरीत - vangyache bharit

Baingan Bharta in English

वेळ: वांग भाजण्यासाठी: भाजण्याच्या पद्धतीनुसार । पाकृसाठी वेळ: ५ ते १० मिनीटे
वाढणी: ३ ते ४ जणांसाठी

baingan bharta, vangyache bharit, eggplant recipe, roasted eggplant, roasted baingan bhurtaसाहित्य:
१ मोठे वांगे
१ मोठा कांदा, बारीक चिरून (साधारण ३/४ ते १ कप)
३ हिरव्या मिरच्या, उभ्या चिरून
फोडणीसाठी: १ टेस्पून तेल, २ चिमटी मोहोरी, १ चिमटी जिरे, १/८ टिस्पून हिंग, १/८ टिस्पून हळद
चवीपुरते मिठ
कोथिंबीर सजावटीसाठी

कृती:
१) वांगं भाजून घ्यावं.
i) गॅसवर: गॅसच्या शेगडीवर वांगं भाजण्यासाठी आधी वांग्याला किंचीत तेल चोळून घ्यावे आणि आचेवर भाजावे. मधेमधे वांगं फिरवावे म्हणजे सर्व ठिकाणी वांगं निट भाजले जाईल. (नोट- गॅसवर वांगं भाजताना वांग्यातील पाणी शेगडीवर पडून डाग पडतात. पण थोडे घासून स्वच्छ करता येते.)
ii) ओव्हनमध्ये: ओव्हन ४०० F वर प्रिहीट करावे. वांग्याला बाहेरून तेल लावून सुरीने किंवा काट्याने (Fork) काहीवेळा टोचावे. अल्युमिनीयम फॉइलमध्ये गुंडाळून ४५ ते ५० मिनीटे बेक करावे. (या पद्धतीने वांग्याचा आतील गर शिजतो पण थेट विस्तवावर भाजल्याने जो स्वाद येतो तो मात्र येत नाही.)
iii) बार्बेक्यु ग्रिलसुद्धा वांगं भाजायला वापरू शकतो.
iv) फायरप्लेस (टीप): ऐकायला मजेशीर वाटेल पण मी वांगं फायरप्लेसमध्ये भाजलं. वांग्याला तेल लावून काहीवेळा सुरीने किंवा काट्याने टोचून घ्यावे. अल्युमिनीयम फॉइलमध्ये व्यवस्थित गुंडाळून घ्यावे. फायरप्लेसमध्ये वरच्या बाजूस धूर बाहेर जाण्यासाठी छोटी खिडकी असते ती प्रथम उघडावी. नंतर २ ते ३ जाडसर फांद्या फायरप्लेसमध्ये रचाव्यात. खाली १-२ नारळाच्या करवंट्या ठेवाव्यात. १-२ चमचे तेल फांद्यांवर शिंपडावे. जागा करून मधल्या जागी वांगं ठेवावे. आग पेटवावी. लागल्यास पेपर किंवा कार्डबोर्डचे तुकडे वापरून आग सुरू करावी. शेकोटी व्यवस्थित पेटल्यावर १० ते १५ मिनीटात वांग भाजलं जातं. वांगं भाजलं गेल्यावर अगदी सांभाळून पापड तळायच्या चिमट्याने बाहेर काढावे.

२) वांगं थोडं गार होवू द्यावं. सालं काढून शेंडी कापून टाकावी. आतील गर जाडसर कापून घ्यावा.
३) वांगं आणि कांदा एकत्र करावा. वांगं भाजल्यावर त्यातून जो रस निघतो तो फेकून देवू नये, तोही वापरावा.
४) कढईत तेल तापवून मोहोरी, जिरे, हिंग, हळद घालून फोडणी करावी. मिरची परतावी. नंतर कांदा-वांग्याचे मिश्रण घालून २-३ मिनीटे परतावे. कोथिंबीरीने सजवून भाकरीबरोबर सर्व्ह करावे.

टीप:
१) वांगं भाजण्यासाठी बाजारात जो फायर स्टार्टर लॉग मिळतो तो वापरला नव्हता कारण तो बनवण्यासाठी कोणत्या गोष्टी किंवा रसायनं वापरतात ते माहीत नसतं. म्हणून झाडाच्या तुटलेल्या फांद्याच वापरल्या होत्या.

Tuesday, January 11, 2011

भोगीची भाजी - Bhogi Bhaji

Bhogichi Bhaji in English

वेळ: पूर्वतयारी २० मिनीटे । पाकृसाठी: १५ ते २० मिनीटे
वाढणी: ३ ते ४ जणांसाठी

bhogichi Bhaji, sankrant tilachya recipes, tilachya recipes, tilgul, tigulache ladu, tilache ladu, mix bhaji, makar sankrant, tilachya vadya, tilgulachya vadyaसाहित्य:
१ मोठा बटाटा, सोलून मध्यम फोडी (साधारण १ ते दिड कप)
१ मध्यम वांगे किंवा ३ ते ४ भरायची लहान वांगी (साधारण १ ते सव्वा कप मध्यम फोडी)
१ कप गाजराचे मध्यम तुकडे
१/२ कप ओले चणे (मी फ्रोजन वापरले होते)
१/४ कप भिजवलेले शेंगदाणे (२-३ तास भिजवणे)
१/४ कप पावट्याचे दाणे (ऐच्छिक)
६ तुकडे शेवगा शेंगेचे (३ इंचाचे तुकडे) (टीप)
फोडणीसाठी - २ टेस्पून तेल, २ चिमटी मोहोरी, २ चिमटी हिंग, १/४ टिस्पून हळद, १/२ टिस्पून लाल तिखट,१/४ टिस्पून जिरे
३-४ कढीपत्ता पाने
२ टेस्पून भाजलेल्या तिळाचा कूट
२ टिस्पून काळा मसाला - रेसिपीसाठी इथे क्लिक करा
२ टेस्पून चिंचेचा दाट कोळ
१ ते दिड टेस्पून किसलेला गूळ
१/४ कप ओलं खोबरं
चवीपुरते मिठ

कृती:
१) पातेल्यात तेल गरम करून मोहोरी, जिरे, हिंग, हळद, लाल तिखट, आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी. प्रथम बटाटा, ओले चणे, पावटे, शेवग्याच्या शेंगा आणि शेंगदाणे घालून २ वाफा काढाव्यात.
२) नंतर वांगं आणि गाजर घालून मिक्स करावे. थोडे पाणी घालून पातेल्यावर झाकण ठेवावे. मध्यम आचेवर शिजू द्यावे.
३) भाज्या शिजत आल्या कि चिंच कोळ आणि काळा मसाला घालावा तसेच लागल्यास थोडे पाणी घालावे.
४) भाज्या शिजल्या कि गूळ, तिळाचा कूट, खोबरं घालावे. लागल्यास चव पाहून मिठ घालावे. एक उकळी काढून भाकरीबरोबर गरमागरम भाजी सर्व्ह करावी.

टीप:
१) शेवग्याच्या शेंगा कोवळ्या घ्याव्यात नाहीतर त्या आतपर्यंत शिजत नाहीत. जर शेंगा जुन असतील तर त्या थोड्या वाफवून घ्याव्या.
२) भाजी शिजायला थोडा वेळ लागतो. जर झटपट भाजी हवी असेल तर चणे, पावटे, शेंगा, शेंगदाणे कूकरमध्ये २ शिट्ट्या करून वाफवून घ्यावे. परंतु भाज्या बाहेर शिजवल्यावर जो स्वाद येतो, तो कूकरमध्ये भाज्या शिजवल्यास येत नाही.

Tuesday, January 12, 2010

वांगी बटाटा रस्सा - Vangi batata Rassa

Vangi Batata Rassa in English

२ ते ३ जणांसाठी
वेळ: २० ते ३० मिनीटे

vangi batata rassa, vangyacha rassa, rassa recipeसाहित्य:
५-६ लहान जांभळी वांगी (टीप १ आणि ३)
२ मध्यम बटाटे
१ टेस्पून तेल
फोडणीचे साहित्य: १/८ टिस्पून मोहोरी, १/४ टिस्पून जिरे, चिमूटभर हिंग, १/४ टिस्पून हळद, १/२ टिस्पून लाल तिखट, २ कढीपत्ता पाने
१ ते दिड टेस्पून दाण्याचा कूट
१ टिस्पून काळा मसाला
१ टेस्पून चिंचेचा कोळ
१ टेस्पून गूळ
चवीपुरते मिठ
१ टेस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर

कृती:
१) वांग्याची देठं काढून टाकावीत. आणि प्रत्येक वांग्याचे ८ लहान तुकडे करावे. गार पाण्यात घालून ठेवावेत. बटाटे सोलून त्याचे मध्यम चौकोनी तुकडे करावेत आणि दुसर्‍या गार पाण्याच्या वाडग्यात ठेवावे.
२) कढईत किंवा जाड बुडाच्या पातेल्यात तेल गरम करावे. त्यात मोहरी, जिरे, हिंग, हळद, लाल तिखट, आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी. बटाट्याच्या फोडी पाण्यातून उपसून काढाव्यात आणि फोडणीत घालाव्यात. २ ते ३ मिनीटे व्यवस्थित परतून घ्याव्यात. थोडावेळ वाफ काढावी.
३) त्यात वांग्याच्या फोडी घालाव्यात. त्यात थोडे पाणी घालून मंद आचेवर वाफ काढावी. त्यात मिठ, चिंचेचा कोळ, आणि काळा मसाला घालून बटाटा आणि वांग्याच्या फोडी शिजू द्याव्यात. गरज लागल्यास थोडे पाणी घालावे.
४) बटाटा आणि वांग्याच्या फोडी शिजल्या नंतरच त्यात गूळ घालावा (टीप २). दाण्याचा कूट घालून उकळी काढावी.
गरमागरम रस्सा पोळी किंवा भाकरीबरोबर सर्व्ह करावा.

टीप:
१) जर लहान वांगी नाही मिळाली तर १ चायनीज वांगे वापरावे किंवा अर्धे मोठे वांगे (भरीताचे) वापरावे.
२) बटाटा आणि वांगे शिजल्यावरच त्यात गूळ घालावा, जर अगोदरच गूळ घातला तर बटाटा आणि वांगे आवठरतात आणि पटकन शिजत नाहीत.
३) कधी कधी मोठी वांगी घशाला खवखवतात, अशावेळी छोटी वांगी बरी पडतात.

Tuesday, March 3, 2009

चिंचकोळाचे वांग्याचे भरीत - Vangyache Bharit

Vangyache Bharit in English

वाढणी: २ जणांसाठी

Vangyache Bharit, Vange Bharit, Bhurta, Baingan ka Bhurta, Eggplant raita
साहित्य:
१/४ कप वांग्याचा गर (वांगे भाजून आणि सोलून घ्यावे. आतील गर मॅश करावा)
१ टेस्पून गूळ
२ टेस्पून चिंचेचा घट्ट कोळ
२ ते ३ टेस्पून कांदा बारीक चिरून
१ टेस्पून तिळाचा कूट (तिळ भाजून मिक्सरमध्ये भरडसर वाटणे)
१ टेस्पून तेल
१/८ टिस्पून मोहोरी (Know More - Facts and Benefits of Mustard Seeds)
१/४ टिस्पून जिरे
चिमूटभर हिंग
२ सुक्या लाल मिरच्या, तुकडे करावे
१/२ टिस्पून लाल तिखट
१ टिस्पून गोडा मसाला
चवीपुरते मिठ
२ टेस्पून कोथिंबीर, बारीक चिरून

कृती:
१) एका वाडग्यात १/४ कप गरम पाणी घ्यावे त्यात १ टेस्पून गूळ किंवा मध्यमसर गूळाचा खडा घालून कुस्करावे किंवा १० मिनीटे तसेच ठेवावे.
२) गूळ पाण्यात मिक्स झाला कि त्यात तिळकूट, गोडा मसाला, थोडे मिठ, कांदा, कोथिंबीर आणि वांग्याचा गर घालून छान मिक्स करावे. हे भरीत किंचीत पातळसर असते त्यामुळे गरजेनुसार पाणी घालावे.
३) कढल्यात तेल गरम करून त्यात मोहोरी, जिरे आणि हिंग घालून फोडणी करावी. गॅस बंद करून सुक्या मिरच्यांचे तुकडे घालावे. हि फोडणी भरीतावर घालावी. चिंचेचा कोळ घालून ढवळावे.
हे भरीत गारच खातात. मूग-तांदूळ खिचडी, मसालेभात किंवा भाकरीबरोबर हे भरीत उत्तम लागते.

टीप:
१) यामध्ये २ चमचे ताजा खोवलेला नारळ घातल्याच चव छान लागते.
२) आंबटपणा जास्त हवा असल्यास अजून थोडा चिंचेचा कोळ घालावा.

Labels:
Tamarind Eggplant Bharta, Baingan Bharta