Showing posts with label U - Z. Show all posts
Showing posts with label U - Z. Show all posts

Friday, September 9, 2011

दह्यातील वांग्याचे भरीत - Vangyache Bharit

Baigan Bhurta (in yogurt) in English

वेळ: १० मिनिटे
साधारण १ कप भरीत
vangyache bharit, baingan bharta, baingan bhurta, dahyatil vangyache bharitसाहित्य:
१ कप भाजलेल्या वांग्याचा गर
१/२ कप बारीक चिरलेला कांदा
१ टीस्पून तेल, १ चिमटी मोहोरी (ऐच्छिक) , २ चिमटी जिरे, १/४ टीस्पून हिंग
२ हिरव्या मिरच्या, उभ्या चिरून
२ ते ३ टेस्पून कोथिंबीर, बारीक चिरून
३/४ कप किंवा गरजेनुसार दही
चवीपुरते मीठ

कृती:
१) वांग्याचा गर सुरीने थोडा कापून घ्यावा. कढल्यात तेल गरम करावे. त्यात जिरे घालून तडतडेस्तोवर थांबावे. हिंग आणि हिरवी मिरची घालावी. तयार फोडणी वांग्यावर घालावी.
२) कांदा आणि मीठ घालून मिक्स करावे. दही आणि कोथिंबीर घालून मिक्स करावे.
जेवणात तोंडीलावणी म्हणून दह्यातील वांग्याचे भरीत छान लागते.

Thursday, August 11, 2011

उपवासाची भाजणी - Upvasachi Bhajni

Upasachi Bhajani in English



वेळ: ३० ते ४० मिनिटे

३०० ग्राम भाजणी



upasachi bhajni, vrat ka ata, fasting flour, sabudana flour, samo seeds flour, rajgira flour, vrat ka loatसाहित्य:

१०० ग्राम साबुदाणा

दिडशे ग्राम वरी तांदूळ

१०० ग्राम राजगिरा

१ टीस्पून जिरं



कृती:

१) साबुदाणा, वरी तांदूळ, आणि राजगिरा गुलाबी रंग येईस्तोवर मंद आचेवर वेगवेगळे भाजावे.

२) भाजलेले सर्व जिन्नस एकत्र करावे. त्यात जिरे न भाजताच घालावे.

३) मिक्सरमध्ये एकदम बारीक करावे किंवा गिरणीतून बारीक दळून आणावे.



टीपा:

१) साबुदाणा भाजण्यापूर्वी त्याला १ टीस्पून तूप लावून घ्यावे म्हणजे भाजताना कढईला चिकटणार नाही.

२) साबुदाणा, वरी, राजगिरा खूप जास्त रंग बदलेस्तोवर भाजू नये. त्यामुळे भाजणीचा रंग डार्क येतो आणि चवही चांगली नाही.

३) जिरे भाजू नये. कच्चेच घालून भाजणी दळावी.

४) आवडीनुसार साबुदाणा, वरी, राजगिरा यांचे प्रमाण कमीजास्त करू शकतो. बऱ्याच जणांना साबुदाण्याचा त्रास होतो. त्यांनी साबुदाणा कमी करून वरी किंवा राजगिरा यांचे प्रमाण वाढवावे.

Tuesday, August 2, 2011

वांगी बटाटा काचऱ्या - Vangi Batata Kacharya

Aloo Baingan Stir Fry in English

वेळ: २० मिनिटे
वाढणी: ३ जणांसाठी

aloo baingan, vangi batata kachrya,  batata kachrya, eggplant stir fry, healthy cookingसाहित्य:
८ ते १० लहान वांगी (टीप १)
२ मध्यम बटाटे
१/२ कप बारीक चिरलेला कांदा
फोडणीसाठी: २ टेस्पून तेल, चिमूटभर मोहोरी, १/८ टीस्पून हिंग, १/४ टीस्पून हळद, १/२ टीस्पून लाल तिखट
४ ते ५ कढीपत्ता पाने
२ टेस्पून शेंगदाण्याचा कूट
२ टेस्पून ताजा खोवलेला नारळ
चवीपुरते मीठ
१/२ टीस्पून साखर किंवा चवीनुसार

कृती:
१) वांगी धुवून घ्यावीत आणि देठं कापून टाकावीत. प्रत्येक वांग्याच्या उभ्या चार फोडी कराव्यात. आणि चतकोर आकाराच्या काचऱ्या कराव्यात. गार पाण्यात बुडवून ठेवाव्यात.
२) बटाटे सोलून उभे चार भाग करून पातळ काचऱ्या कराव्यात.
३) कढईत तेल गरम करावे. मोहोरी, हिंग, हळद, लाल तिखट आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी. कांदा आणि बटाटा घालावा. थोडे मीठ घालावे. झाकण ठेवून बटाटे ५०% शिजवावे.
४) वांग्यातील पाणी पूर्णपणे काढून टाकावे. वांग्याच्या काचऱ्या कढईत घालाव्यात. झाकण न ठेवता वांगी परतत राहावी. वांगी पटकन शिजतात, म्हणून कढईवर झाकण ठेवू नये.
५) वांगी शिजली कि चव पाहून लागल्यास मीठ घालावे. आता शेंगदाण्याचा कूट, साखर, आणि नारळ घालून मिक्स करावे. एक दोन मिनिटे भाजी परतावी आणि गरमच पोळीबरोबर किंवा आमटी भाताबरोबर वाढावी.

टीपा:
१) मोठे वांगेसुद्धा वापरता येईल. तेव्हा वांगं-बटाट्याचे प्रमाण १ कप वांग्याच्या काचऱ्यांना ३/४ कप बटाट्याच्या काचऱ्या असे असावे.
२) आंबटपणासाठी १ टीस्पून लिंबाचा रस भाजी तयार झाल्यावर शेवटी घालावा.

Tuesday, April 19, 2011

उकडपेंडी - Ukadpendi

ukadpendi in English

वेळ: १५ मिनीटे
वाढणी: २ जणांसाठी

ukadpendi, maharashtrian recipes,breakfast recipes, snacks, quick breakfastसाहित्य:
१/२ कप रवाळ कणिक
३ टेस्पून तेल
१/४ कप कांदा, बारीक चिरून
४ ते ५ कढीपत्ता पाने
फोडणीसाठी: चिमटीभर मोहोरी, १/४ टिस्पून हिंग, १/८ टिस्पून हळद, २ सुक्या लाल मिरच्या
१/२ कप दही, घोटलेले
१/४ कप पाणी (टीप १)
चवीपुरते मिठ

कृती:
१) कढईत तेल गरम करावे. कणिक मध्यम आचेवर गुलाबीसर भाजून घ्यावी (साधारण ५ ते ७ मिनीटे). भाजलेली कणिक लहान वाडग्यात काढून ठेवावी.
२) त्याच कढईत १ टेस्पून तेल घालावे. मोहोरी, हिंग, हळद, लाल मिरच्या आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी. कांदा घालून गुलाबीसर होईस्तोवर परतून घ्यावा. मिठ घालून मिक्स करावे.
३) भाजलेली कणिक घालून एक-दोन मिनीट मिक्स करावे. दही आणि पाणी मिक्स करावे आणि हे मिश्रण कढईत ओतावे. आणि पटापट मिक्स करावे. मिश्रणाचा गोळा तयार होईल. एकदम व्यवस्थित मिक्स करावे, गुठळी होवू देऊ नये. झाकण ठेवून मंद आचेवर काही मिनीटे वाफ काढावी.
कोथिंबीरीने सजवून सर्व्ह करावे.

टीपा:
१) उकड पातळ किंवा घट्ट हवी असेल त्याप्रमाणे पाण्याचे प्रमाण कमी किंवा जास्त करावे. वरील कृतीमध्ये घट्ट उकड होईल एवढे पाण्याचे प्रमाण दिले आहे. पण उकड पातळ हवी असेल तर पाणी जास्त घालावे.
२) उकड ही कच्चं तेल घालून, चांगली मळून मग खातात. त्यासाठी घट्ट उकड करावी. गरमच असताना परातीत घेऊन थोडे तेल घालून लगेच मळावी. गरम मळताना चटका बसतो म्हणून उकड मळण्यासाठी लाकडी चकती मिळते ती वापरावी. ती जर नसेल तर खलबत्त्यातील खलायचे भांडे घ्यावे. त्याच्या तळाला तेल लावून त्याने मळावी. गरम गरम उकड सर्व्ह करावी.
३) लाल मिरची ऐवजी काहीजण हिरवी मिरची किंवा लाल तिखटही वापरतात.
४) कांदा हा ऐच्छिक आहे. पण चव चांगली येते कांद्यामुळे. तसेच कांद्याऐवजी लसूण वापरता येते. अधिक पौष्टीक बनवायची असल्यास मटार, गाजराचे तुकडे, भिजवलेली मूग-मटकीही घालू शकतो.
५) ही उकड तांदूळाची, बेसनाची, ज्वारीच्या पिठाची करता येते. पद्धत हीच फक्त पिठ वेगवेगळे वापरावे. किंवा मिश्र पिठाची सुद्धा उकड बनवता येते.

Wednesday, April 13, 2011

व्हेज कोल्हापूरी - Veg Kolhapuri

Veg Kolhapuri in English

वेळ: ४० मिनीटे
वाढणी: ४ जणांसाठी

veg kolhapuri, Maharashtrian curry, Indian curryसाहित्य:
१/२ कप गाजराचे चौकोनी तुकडे
३/४ कप बटाटयाचे मोठे तुकडे (बटाटा सोलून)
१/२ कॉलीफ्लॉवरचे मध्यम तुरे (फ्रोझन)
१/२ कप हिरवे मटार (फ्रोझन)
१/४ कप फरसबीचे तुकडे (१ इंच)
१/२ कप कांदा, बारीक चिरून
१ कप टोमॅटो, बारीक चिरून
१/२ इंच आल्याचा तुकडा, बारीक चिरून
४ ते ६ मोठ्या लसूण पाकळ्या, बारीक चिरून
१ ते दिड टेस्पून काश्मिरी लाल तिखट (टीप ३ व ५)
२ टिस्पून साधं लाल तिखट
१/४ टिस्पून हळद
६ टेस्पून तेल
२ टेस्पून कोल्हापूरी मसाला
इतर मसाले:
१/४ टिस्पून वेलची पावडर
२ चिमटी लवंग पावडर
१/२ टिस्पून बडीशेप पावडर
१/२ टिस्पून दालचिनी पावडर
१ चिमटी जायफळ पावडर
चवीपुरते मिठ

कृती:
१) कढईत २ टेस्पून तेल गरम करावे. त्यात आलं-लसूण परतून घ्यावे. कांदा घालून लालसर होईस्तोवर परतावे. साधं लाल तिखट आणि टोमॅटो घालावा.मिठ घालून टोमॅटो अगदी नरम होईस्तोवर परतावे. हा मसाला थोडा गार होवू द्यावा. नंतर थोडे पाणी घालून मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटून घ्यावे.
२) त्याच कढईत ३ टेस्पून तेल, मध्यम आचेवर गरम करावे त्यात हळद आणि १/२ टिस्पून काश्मिरी लाल तिखट घालून लगेच फरसबी आणि बटाट्याचे तुकडे घालावे. मिक्स करून २ ते ३ वाफा काढाव्यात. बटाटे किंचीतच शिजू द्यावे. आच मोठी करून (बटाटे व तिखट करपणार नाही याची काळजी घ्यावी.) कांदा-टोमॅटोची प्युरी घालावी. आच मोठी ठेवल्याने तेल व्यवस्थित तापते आणि फोडणी चांगली बसते. मिश्रण निट ढवळून गरजेपुरते पाणी घालावे.
३) कढईतील मिश्रणाला उकळी येऊ द्यावी. त्यात कोल्हापूरी मसाला, बडीशेप पावडर, लवंग पावडर, दालचिनी पावडर, वेलचीपूड आणि चवीपुरते मिठ घालावे. गाजर, मटार आणि कॉलीफ्लॉवर घालावा. मध्यम आचेवर झाकण ठेवून शिजू द्यावे. १० मिनीटे शिजवावे.
भाजी तयार झाली कि १ ते दिड टिस्पून तेल फोडणीसाठीच्या कढल्यात गरम करावे. १ टेस्पून काश्मिरी लाल तिखट घालावे. आणि लगेचच हि फोडणी भाजीवर ओतावी. (टीप)
ढवळून भाजी सर्व्ह करावी.

टीप:
१) हि भाजी तिखटच असते, पण आपल्या आवडीनुसार तिखटाचे प्रमाण कमीजास्त करावे.
२) काश्मिरी लाल तिखटाला खुप छान लाल रंग असतो पण तिखटपणा नसतो. म्हणून नेहमीच्या वापरातील लाल तिखट हे तिखटपणासाठी आणि काश्मिरी लाल तिखट हे रंगासाठी वापरले आहे.
३) शेवटला जी काश्मिरी लाल तिखटाची फोडणी घालायची आहे ती पूर्णत: ऐच्छिक आहे, या फोडणीमुळे भाजीवर मस्तपैकी लालसर तवंग येतो. तसेच हि फोडणी घालताना तिखट गरम तेलात टाकल्याटाकल्या भाजीवर ओतावी, वेळ लावू नये नाहीतर तिखट करपते.
४) जे मसाले वापरले आहेत ते जरी कमी प्रमाणात आहेत तरी एकत्रितपणे खुप छान हलकासा स्वाद या भाजीला येतो. आवडीनुसार कुठलाही मसाल्याचे प्रमाण किंचीत वाढवले तरी चालते.
५) काश्मिरी लाल तिखटाने स्वाद आणि रंग चांगला येतो. जर अगदीच काश्मिरी लाल तिखट मिळाले नाही तर त्याऐवजी खायचा लाल रंग चिमूटभर वापरू शकतो.

Thursday, March 24, 2011

वांग्याचे भरीत - vangyache bharit

Baingan Bharta in English

वेळ: वांग भाजण्यासाठी: भाजण्याच्या पद्धतीनुसार । पाकृसाठी वेळ: ५ ते १० मिनीटे
वाढणी: ३ ते ४ जणांसाठी

baingan bharta, vangyache bharit, eggplant recipe, roasted eggplant, roasted baingan bhurtaसाहित्य:
१ मोठे वांगे
१ मोठा कांदा, बारीक चिरून (साधारण ३/४ ते १ कप)
३ हिरव्या मिरच्या, उभ्या चिरून
फोडणीसाठी: १ टेस्पून तेल, २ चिमटी मोहोरी, १ चिमटी जिरे, १/८ टिस्पून हिंग, १/८ टिस्पून हळद
चवीपुरते मिठ
कोथिंबीर सजावटीसाठी

कृती:
१) वांगं भाजून घ्यावं.
i) गॅसवर: गॅसच्या शेगडीवर वांगं भाजण्यासाठी आधी वांग्याला किंचीत तेल चोळून घ्यावे आणि आचेवर भाजावे. मधेमधे वांगं फिरवावे म्हणजे सर्व ठिकाणी वांगं निट भाजले जाईल. (नोट- गॅसवर वांगं भाजताना वांग्यातील पाणी शेगडीवर पडून डाग पडतात. पण थोडे घासून स्वच्छ करता येते.)
ii) ओव्हनमध्ये: ओव्हन ४०० F वर प्रिहीट करावे. वांग्याला बाहेरून तेल लावून सुरीने किंवा काट्याने (Fork) काहीवेळा टोचावे. अल्युमिनीयम फॉइलमध्ये गुंडाळून ४५ ते ५० मिनीटे बेक करावे. (या पद्धतीने वांग्याचा आतील गर शिजतो पण थेट विस्तवावर भाजल्याने जो स्वाद येतो तो मात्र येत नाही.)
iii) बार्बेक्यु ग्रिलसुद्धा वांगं भाजायला वापरू शकतो.
iv) फायरप्लेस (टीप): ऐकायला मजेशीर वाटेल पण मी वांगं फायरप्लेसमध्ये भाजलं. वांग्याला तेल लावून काहीवेळा सुरीने किंवा काट्याने टोचून घ्यावे. अल्युमिनीयम फॉइलमध्ये व्यवस्थित गुंडाळून घ्यावे. फायरप्लेसमध्ये वरच्या बाजूस धूर बाहेर जाण्यासाठी छोटी खिडकी असते ती प्रथम उघडावी. नंतर २ ते ३ जाडसर फांद्या फायरप्लेसमध्ये रचाव्यात. खाली १-२ नारळाच्या करवंट्या ठेवाव्यात. १-२ चमचे तेल फांद्यांवर शिंपडावे. जागा करून मधल्या जागी वांगं ठेवावे. आग पेटवावी. लागल्यास पेपर किंवा कार्डबोर्डचे तुकडे वापरून आग सुरू करावी. शेकोटी व्यवस्थित पेटल्यावर १० ते १५ मिनीटात वांग भाजलं जातं. वांगं भाजलं गेल्यावर अगदी सांभाळून पापड तळायच्या चिमट्याने बाहेर काढावे.

२) वांगं थोडं गार होवू द्यावं. सालं काढून शेंडी कापून टाकावी. आतील गर जाडसर कापून घ्यावा.
३) वांगं आणि कांदा एकत्र करावा. वांगं भाजल्यावर त्यातून जो रस निघतो तो फेकून देवू नये, तोही वापरावा.
४) कढईत तेल तापवून मोहोरी, जिरे, हिंग, हळद घालून फोडणी करावी. मिरची परतावी. नंतर कांदा-वांग्याचे मिश्रण घालून २-३ मिनीटे परतावे. कोथिंबीरीने सजवून भाकरीबरोबर सर्व्ह करावे.

टीप:
१) वांगं भाजण्यासाठी बाजारात जो फायर स्टार्टर लॉग मिळतो तो वापरला नव्हता कारण तो बनवण्यासाठी कोणत्या गोष्टी किंवा रसायनं वापरतात ते माहीत नसतं. म्हणून झाडाच्या तुटलेल्या फांद्याच वापरल्या होत्या.

Thursday, November 11, 2010

मायक्रोवेव्ह उपमा - Microwave Upma

Microwave Upma in English

वेळ: साधारण २० मिनीटे
वाढणी: ३ जणांसाठी

upma, rava upma, upma recipe, Indian breakfast recipe, healthy breakfast, poha, vermicelli upmaसाहित्य:
३/४ कप रवा
१ ते २ टेस्पून तूप
फोडणीसाठी - १ टेस्पून तूप, चिमूटभर मोहोरी, १/४ टिस्पून जिरे, १/२ टिस्पून उडीद डाळ, चिमूटभर हिंग, ३ हिरव्या मिरच्या, ४-५ कढीपत्ता पाने, १/४ टिस्पून आले
१/२ कप कांदा, बारीक चिरलेला
१/४ कप मटार (ऐच्छिक)
१/२ कप टोमॅटो, बारीक चिरलेला (ऐच्छिक)
मिठ, साखर चवीनुसार
१ टेस्पून तूप (ऐच्छिक)
सजावटीसाठी कोथिंबीर, लिंबू, ताजा खोवलेला नारळ
मायक्रोवेव्ह सेफ ग्लास बाऊल विथ ग्लास लिड

कृती:
रवा भाजणे
१) ३/४ कप रवा मायक्रोवेव्ह सेफ झाकणात समान पसरवून हाय पॉवरवर दिड मिनीट मायक्रोवेव्ह करा. डीश बाहेर काढून चमच्याने रवा ढवळावा. परत दिड मिनीट मायक्रोवेव्ह करावा. डीश बाहेर काढून ढवळावा. नंतर अजून २ मिनीटे मायक्रोवेव्ह करावा. (दिड मिनीट + दिड मिनीट + १ मिनीट + १ मिनीट) (महत्त्वाची टिप १)
फोडणी:
२) आता मायक्रोवेव्ह सेफ काचेच्या वाडग्यात १ टेस्पून तूप घ्या. हाय हाय पॉवरवर दिड मिनीट मायक्रोवेव्ह करा. त्यात मोहोरी, जिरे आणि उडीदडाळ घालून दिड मिनीट ते दोन मायक्रोवेव्ह करा. वाटल्यास मध्येच भांडे बाहेर काढून ढवळा.
३) आता हिंग, चिरलेल्या मिरच्या, कढीपत्ता, ठेचलेले आले घालून ३० ते ४० सेकंद मायक्रोवेव्ह करा.
४) बारीक चिरलेला कांदा घालून मिक्स करा. साधारण दिड मिनीट असे ३ वेळा मायक्रोवेव्ह करा.
५) आता चिरलेला टोमॅटो, मटार घालून मिक्स करा. दिड मिनीट असे दोनदा मायक्रोवेव्ह करा. मधे भांडे बाहेर काढून ढवळा.
६) सव्वा कप पाणी घाला. चवीपुरते मिठ आणि साखर घालून पाण्याची चव पाहून लागल्यास मिठ किंवा साखर अड्जस्ट करा. १ मिनीट मायक्रोवेव्ह करा.
७) भाजलेला रवा घालून मिक्स करा. झाकण ठेवून २ मिनीटे मायक्रोवेव्ह करा. भांडे बाहेर काढून थोडे तूप घाला आणि मिक्स करा. परत २ मिनीटे मायक्रोवेव्ह करा. आणि थोडावेळ वाफ मुरावी म्हणून तसाच आत ठेवा. ३ ते ४ मिनीटांनी तयार उपमा बाहेर काढून कोथिंबीर, लिंबू, ओला नारळ यांनी सजवून सर्व्ह करा.

टीप:
१) प्रत्येक मायक्रोवेव्हची पॉवर वेगवेगळी असते त्यामुळे वर दिलेल्या कालावधी एखाद मिनीट कमी किंवा जास्त होवू शकते याची नोंद घ्यावी.
२) तूपाऐवजी तेलही वापरू शकतो. तूपामुळे खुप छान चव येते.
३) आवडीनुसार काजूही घालू शकतो.
४) वेळ व्यवस्थित वापरल्यास २०-२२ मिनीटांत उपमा बनतो. म्हणजे रवा भाजताना कांदा, टोमॅटो चिरून घ्यावा तसेच बाकीची तयारी घ्यावी.
५) १ ते ६ स्टेप्स काचेचे भांडे न झाकता फॉलो करा, आणि फक्त ७ व्या स्टेपमध्ये भांड्यावर झाकण ठेवावे.

उपम्याच्या इतर रेसिपीज
रवा उपमा - शेगडी वापरून
शेवई उपमा

Labels:
Upma, rava upma, Microwave upma

Thursday, March 11, 2010

वरी तांदूळ - Vari Tandul Bhat

Vari Tandulacha Bhat in English

वेळ: १० ते १५ मिनीटे
वाढणी: २ ते ३ जणांसाठी

upas, upavas, fast recipe, fasting recipes, bhagar recipe, variche tandul, danyachi amti, sabudana khichdi, sabudana recipes, farali padarth, upasacha varicha tandulवरी तांदूळाचा भात शेंगदाण्याच्या आमटीबरोबर अतिशय सुरेख लागतो. शेंगदाणा आमटीच्या कृतीसाठी इथे क्लिक करा.
इतर संबंधित पाककृती : उपासाची बटाटा भाजीउपासाच्या इतर पाककृती.

साहित्य:
३/४ कप वरी तांदूळ (उपासाची भगर)
अडीच कप गरम पाणी
१ टिस्पून तूप
१/४ टिस्पून जिरे
चवीपुरते मिठ

कृती:
१) पातेल्यात तूप गरम करावे, त्यात जिरे घालून थोडे तडतडू द्यावे. वरी तांदूळ घालून थोडावेळ परतावे.
२) तांदूळ जरासे गुलाबीसर झाले कि अडीच कप गरम पाणी घालावे. चवीनुसार मिठ घालून ढवळावे आणि पातेल्यावर झाकण ठेवून मंद आचेवर वरी तांदूळ शिजू द्यावा.

टीप:
१) वरी तांदूळ आपापल्या चवीनुसार बनवता येतो. काही जण प्लेन वरी तांदूळ बनवतात. ज्यामध्ये तूपात फक्त तांदूळ परतून मिठ घालून शिजवतात.
२) वरी तांदूळ शिजताना एखादे आमसुल घातल्यास छान आंबटसर चव येते.
३) जर एकदम मऊसर भगर (वरी तांदूळ) हवी असेल तर पाण्याचे प्रमाण पाऊण कपाने वाढवावे.

Labels:
vari Tandul, Bhagar, Samo seeds rice, fasting recipes,

Tuesday, January 12, 2010

वांगी बटाटा रस्सा - Vangi batata Rassa

Vangi Batata Rassa in English

२ ते ३ जणांसाठी
वेळ: २० ते ३० मिनीटे

vangi batata rassa, vangyacha rassa, rassa recipeसाहित्य:
५-६ लहान जांभळी वांगी (टीप १ आणि ३)
२ मध्यम बटाटे
१ टेस्पून तेल
फोडणीचे साहित्य: १/८ टिस्पून मोहोरी, १/४ टिस्पून जिरे, चिमूटभर हिंग, १/४ टिस्पून हळद, १/२ टिस्पून लाल तिखट, २ कढीपत्ता पाने
१ ते दिड टेस्पून दाण्याचा कूट
१ टिस्पून काळा मसाला
१ टेस्पून चिंचेचा कोळ
१ टेस्पून गूळ
चवीपुरते मिठ
१ टेस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर

कृती:
१) वांग्याची देठं काढून टाकावीत. आणि प्रत्येक वांग्याचे ८ लहान तुकडे करावे. गार पाण्यात घालून ठेवावेत. बटाटे सोलून त्याचे मध्यम चौकोनी तुकडे करावेत आणि दुसर्‍या गार पाण्याच्या वाडग्यात ठेवावे.
२) कढईत किंवा जाड बुडाच्या पातेल्यात तेल गरम करावे. त्यात मोहरी, जिरे, हिंग, हळद, लाल तिखट, आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी. बटाट्याच्या फोडी पाण्यातून उपसून काढाव्यात आणि फोडणीत घालाव्यात. २ ते ३ मिनीटे व्यवस्थित परतून घ्याव्यात. थोडावेळ वाफ काढावी.
३) त्यात वांग्याच्या फोडी घालाव्यात. त्यात थोडे पाणी घालून मंद आचेवर वाफ काढावी. त्यात मिठ, चिंचेचा कोळ, आणि काळा मसाला घालून बटाटा आणि वांग्याच्या फोडी शिजू द्याव्यात. गरज लागल्यास थोडे पाणी घालावे.
४) बटाटा आणि वांग्याच्या फोडी शिजल्या नंतरच त्यात गूळ घालावा (टीप २). दाण्याचा कूट घालून उकळी काढावी.
गरमागरम रस्सा पोळी किंवा भाकरीबरोबर सर्व्ह करावा.

टीप:
१) जर लहान वांगी नाही मिळाली तर १ चायनीज वांगे वापरावे किंवा अर्धे मोठे वांगे (भरीताचे) वापरावे.
२) बटाटा आणि वांगे शिजल्यावरच त्यात गूळ घालावा, जर अगोदरच गूळ घातला तर बटाटा आणि वांगे आवठरतात आणि पटकन शिजत नाहीत.
३) कधी कधी मोठी वांगी घशाला खवखवतात, अशावेळी छोटी वांगी बरी पडतात.

Thursday, November 19, 2009

भाज्यांचे इंस्टंट लोणचे - Instant vegetable Pickle

Instant Vegetable Pickle in English

साधारण दिड कप
वेळ: २० मिनीटे

Instant pickle, spicy instant pickle, carrot pickle, cauliflower pickle, vegetable pickleसाहित्य:
१ कप गाजराचे छोटे तुकडे
१/२ कप कॉलिफ्लॉवरचे एकदम छोटे तुकडे
१/४ कप मटाराचे दाणे
१ टिस्पून मिठ किंवा चवीनुसार
दिड टिस्पून लाल तिखट
१/२ टिस्पून हळद
१/४ टिस्पून हिंग
४ ते ५ मेथीचे दाणे
१/४ + १/४ टिस्पून मोहरी
१ लिंबाचा रस
२ टिस्पून तेल

कृती:
१) गाजर, कॉलिफ्लॉवर, मटार एकत्र करावेत. त्यात मिठ, लाल तिखट, हळद, हिंग, एकत्र करावे. १/४ टिस्पून मोहरीची भरडसर पावडर करून मिक्स करावी.
२) तेल गरम करून त्यात मेथी दाणे गुलाबी रंगावर तळून घ्यावे. मेथीदाणे बाजूला काढून त्याच तेलात १/४ टिस्पून मोहरी घालून फोडणी करावी. हि फोडणी गार झाली कि लोणच्यामध्ये घालावी.
३) तळलेले मेथीदाणे खलबत्त्यात कुटून घ्यावे आणि लोणच्यात मिक्स करावे.
४) लिंबाचा रस घालून मिक्स करावे.
हे लोणचे लगेच खाण्यासाठी छान लागते. फ्रिजमध्ये ४-६ दिवस सहज टिकते.

Label:
Instant vegetable pickle, Indian pickle recipe

Tuesday, April 7, 2009

वेजिटेबल सूप - Vegetable Coriander Soup

Vegetable Coriander Soup in English

वाढणी: प्रत्येकी साधारण १ कप (३ ते ४ जणांसाठी)

vegetable coriander soup, Chinese vegetable soup, authentic chinese recipe, vegetable soup recipeसाहित्य:
२ टेस्पून किसलेले गाजर
२ टेस्पून कॉलीफ्लॉवर,एकदम बारीक चिरून
२ टेस्पून कोबी, एकदम बारीक चिरून
२ टिस्पून लसूण पेस्ट
२ टिस्पून तेल
३ टेस्पून कोथिंबीर, बारीक चिरून
४ टेस्पून पाती कांदयाची हिरवी पात बारीक चिरून
चवीपुरते मिठ
१/४ टिस्पून मिरपूड
१ टिस्पून विनेगर किंवा लिंबाचा रस
२ टेस्पून कॉर्न स्टार्च
४ कप पाणी
१ टिस्पून सोयासॉस (ऐच्छिक)

easy vegetable soup recipe, recipe for vegetarian soupकृती:
१) कढईत तेल गरम करावे त्यात लसूण पेस्ट घालून गुलाबी रंग येईस्तोवर परतावी, जास्त ब्राऊन करू नये.
२) त्यात कॉलीफ्लॉवर, गाजर आणि कोबी घालून ३० ते ४० सेकंद मोठ्या आचेवर परतावे. नंतर ४ टेस्पूनपैकी २ टेस्पून कांद्याची पात घालून १० ते १५ सेकंद परतावे. लगेच ४ पैकी साडे तीन कप पाणी घालावे. चवीपुरते मिठ घालावे.
३) सूपला घट्टपणा येण्यासाठी आपण कॉर्न स्टार्च वापरणार आहोत. तेव्हा सूपला उकळी येईस्तोवर उरलेल्या १/२ कप पाण्यात २ टेस्पून कॉर्न स्टार्च निट मिक्स करून ते मिश्रण उकळत्या सूपमध्ये घालावे. घालताना सारखे ढवळावे म्हणजे गुठळ्या होणार नाहीत.
४) सूप १ ते २ मिनीट उकळू द्यावे म्हणजे कॉर्न स्टार्च कच्चा राहणार नाही. त्यानंतर गॅस बंद करून त्यात विनेगर आणि कोथिंबीर घालून ढवळावे. बोलमध्ये सर्व्ह करावे. सर्व्ह करताना वरून थोडी मिरपूड आणि पाती कांदा घालावा. तसेच १/४ टिस्पून सोयासॉसही घालू शकतो.

टीप:
१) या सूपमध्ये विनेगर जास्त चांगले लागते पण विनेगरचा वास आवडत नसेल तर लिंबाचा रसही वापरू शकतो.
२) सूपचा घट्टपणा अडजस्ट करण्यासाठी गरजेनुसार पाण्याचे प्रमाण कमीजास्त करावे.

Labels:
Coriander Soup, Vegetable Soup

Tuesday, March 3, 2009

चिंचकोळाचे वांग्याचे भरीत - Vangyache Bharit

Vangyache Bharit in English

वाढणी: २ जणांसाठी

Vangyache Bharit, Vange Bharit, Bhurta, Baingan ka Bhurta, Eggplant raita
साहित्य:
१/४ कप वांग्याचा गर (वांगे भाजून आणि सोलून घ्यावे. आतील गर मॅश करावा)
१ टेस्पून गूळ
२ टेस्पून चिंचेचा घट्ट कोळ
२ ते ३ टेस्पून कांदा बारीक चिरून
१ टेस्पून तिळाचा कूट (तिळ भाजून मिक्सरमध्ये भरडसर वाटणे)
१ टेस्पून तेल
१/८ टिस्पून मोहोरी (Know More - Facts and Benefits of Mustard Seeds)
१/४ टिस्पून जिरे
चिमूटभर हिंग
२ सुक्या लाल मिरच्या, तुकडे करावे
१/२ टिस्पून लाल तिखट
१ टिस्पून गोडा मसाला
चवीपुरते मिठ
२ टेस्पून कोथिंबीर, बारीक चिरून

कृती:
१) एका वाडग्यात १/४ कप गरम पाणी घ्यावे त्यात १ टेस्पून गूळ किंवा मध्यमसर गूळाचा खडा घालून कुस्करावे किंवा १० मिनीटे तसेच ठेवावे.
२) गूळ पाण्यात मिक्स झाला कि त्यात तिळकूट, गोडा मसाला, थोडे मिठ, कांदा, कोथिंबीर आणि वांग्याचा गर घालून छान मिक्स करावे. हे भरीत किंचीत पातळसर असते त्यामुळे गरजेनुसार पाणी घालावे.
३) कढल्यात तेल गरम करून त्यात मोहोरी, जिरे आणि हिंग घालून फोडणी करावी. गॅस बंद करून सुक्या मिरच्यांचे तुकडे घालावे. हि फोडणी भरीतावर घालावी. चिंचेचा कोळ घालून ढवळावे.
हे भरीत गारच खातात. मूग-तांदूळ खिचडी, मसालेभात किंवा भाकरीबरोबर हे भरीत उत्तम लागते.

टीप:
१) यामध्ये २ चमचे ताजा खोवलेला नारळ घातल्याच चव छान लागते.
२) आंबटपणा जास्त हवा असल्यास अजून थोडा चिंचेचा कोळ घालावा.

Labels:
Tamarind Eggplant Bharta, Baingan Bharta